[Etv Bharat]पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, म्हणाल्या 'तर सगळी जमीन माझी...'
बारामती (पुणे): खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित गावातील लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे मांडल्या. पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केली, कसे चुकीचे गुन्हे दाखल केले याबाबत माहिती दिली. तर येथील अनेक लोकांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील रोष व्यक्त केला.
विमानतळाला माझा विरोध नाही : विमानतळाबाबत तुमची नक्की भूमिका स्पष्ट करा, असं म्हणत गावकऱ्यांनी सुप्रिया सुळेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानतळाला माझा विरोध नाही. मात्र जागेला माझा विरोध असल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "ज्या भागातील लोक जमीन द्यायला तयार असतील, त्या भागात विमानतळ करावं, जिथं लोकांचा विरोध असेल, त्या भागातील लोकांवर बळजबरी केली जाऊ नये," असं सुळे यांनी स्पष्ट केलं.
माझी जमीन दाखवा ती जमीन मी तुम्हाला देते : एका शेतकऱ्याने पुरंदर तालुक्यात सुप्रिया सुळे यांची जमीन आहे, असा आरोप केला. याबाबत त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना विचारलं. यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझी, शरद पवारांची, सदानंद सुळे किंवा प्रतिभा पवार यांची एक इंच जमीन देखील येथे नाही. कुणीही सातबारा दाखवा ती जमीन त्याच्या नावे करून देते. कोणीही कुठेही आमच्या जमिनी असल्याचं सांगते, पण ते खरं नाही. मी सरकारला टॅक्स भरते. त्यामुळं माझ्याकडं येणार उत्पन्न एक नंबरचं आहे. आम्ही जमीन घेतली तर ती आमच्या नावानं असेल. आमच्या नावाचा गैरवापर केला जातोय. अनेक ठिकाणी माझ्या जमिनी आहेत, असं सांगितलं जाते पण ते खरं नाही".
कृती समितीत काम करणार : यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ विरोधासाठी कृती समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या. या कृती समितीमध्ये पक्षविरहित काम करूया, असं त्यांनी म्हटलं. "प्रत्येक गावातील दोन व्यक्ती या कृती समितीमध्ये घ्याव्यात. त्याचबरोबर मी स्वतः देखील काम करेन. समितीच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेऊ. हे विमानतळ आम्हाला नको, असं त्यांना सांगू, त्याचबरोबर पुरंदरचं अंजीर, सीताफळ त्यांना भेट देऊ, मी तुमच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळं कोणीही गैरसमज करून घेऊ नये," असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे, शिष्ठमंडळ घेणार ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट : आंदोलकांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा पाढाच आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडला. "आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं होतं. त्या तरुणांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर बैलगाडी चालकांवर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 307 सारखा गंभीर गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. शासनाने आमची ही मुले सोडली नाही, तर आम्ही पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करू, आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या," असं यावेळी शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना म्हटलं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला आणि आज दुपारी सासवड येथे पंकज देशमुख यांच्या समवेत भेट निश्चित केली. सात गावांचं शिष्टमंडळ आणि खासदार सुप्रिया सुळे या आज पंकज देशमुख यांची यासंदर्भात भेट घेणार आहेत.
