[My Mahanagar]धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला सुप्रिया सुळेंचा तीव्र विरोध; म्हणाल्या…
पुणे – सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत पुन्हा येऊ देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्यभरातून कोकाटेंविरोधात विविध पक्ष आणि संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे. याआधीही माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यां संबंधी वादग्रस्त विधाने केली आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सभागृहात कोकाटेंचा पत्त्यांचा डाव रंगलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार आणि धनंजय मुंडे यांचा कृषीमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे, यासंबंधी खासदार सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी भारतीय जनता पक्ष आणि आमदार सुरेश धस यांना विचारला पाहिजे. ज्या व्यक्तीवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. त्यासोबतच वैयक्तिक अनेक गुन्हे दाखल आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची ज्यापद्धतीने हत्या झाली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक आहे. त्या वाल्मिक कराडचा आका कोण, हे सुरेश धसांनी वारंवार सांगितले आहे. ज्या आकामुळे कुटुंब उद्धवस्त झाले आहे. त्या देशमुख कुटुंबाला काय उत्तर देणार, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
देशमुख कुंटुंबाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता तेव्हा खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत आवाज उठवला. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. महादेव मुंडेंच्या पत्नीला न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला, तेव्हा कुठे यंत्रणा जागी झाली. राज्यात असे सर्व घडत असताना कोणती क्लीनचीट मिळाली आहे, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
महाराष्ट्रात घरच्याघरं उद्धस्त होत आहेत आणि हे लोक कसल्या क्लीनचीट देत आहेत. या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि घरं उद्धवस्त करणार असेल तर त्याविरोधात आम्ही लढत राहाणार. या लढाईला आणि न्याय मिळायला कितीही उशिर झाला तरी आम्ही लढत राहू. अशा घटनांची जे पाठराखण करणार असतील अशा लोकांना निर्णय प्रक्रियेत येऊ देणार नाही, असा निर्धार सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला.

