2 minutes reading time (372 words)

[Sakal]वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Walmik Karad News: बीडच्या मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे कारनामे संपायचं नाव घेत नाहीत. बीडच्या जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड स्वतःला विशेष सुविधा घेत असल्याचा आरोप होतोय. अशा तक्रारी यापूर्वीदेखील झालेल्या आहेत. मात्र आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केलाय.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत म्हटलंय की, मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे.

यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. ९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत.

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात की, न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी. आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे. तसेच पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. बीड जिल्हा कारागृहात काही ठराविक कैद्यांना नियमांचे उल्लंघन करून विशेष सवलती व सुविधा पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यात कारागृहात मोबाईल फोन वापरण्याची मुभा देणे, बंदी घातलेल्या वस्तू उपलब्ध करून देणे तसेच इतर अवाजवी लाभ पोहोचवणे यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश असल्याचे खा.सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले होते. 

[TV9 Marathi]मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या अडचणी वा...
[ABP MAJHA]वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, ...