[Sarkarnama]माघारीवरून NCP वर गंभीर आरोप? सुप्रिया सुळेंनी सिल्व्हर ओकवरील बैठकीचा दाखला दिला
काँग्रेसने सर्व दावे खोडून काढले
पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटला असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकी मधून माघार घेऊन आमचा विश्वासघात केला असल्याचं आरोप काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.
हे सर्व आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माध्यमांना खुलासा केला आहे त्यांनी याबाबत सांगितलं की, ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्याची विधानपरिषदेचे जागा न लढवण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकत्रित बैठक सिल्वरओक या ठिकाणी सकाळी 11 ते दरम्यान झाली आणि त्यानंतरच अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पुण्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी विश्वासघाताचा मुद्दा खोडून काढत सर्व मित्र पक्षांना विश्वासात घेऊनच पुण्यातील विधान परिषदेचे माघारीचा निर्णय झाला असल्याचा सांगितलं होतं. मात्र त्यानंतर काँग्रेसने आता याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्या बैठकीच्या उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला. त्या बैठकीला पुण्यातून काँग्रेसचे गटनेते चंदू कदम हे उपस्थित होते.
चंदू कदम यांनी सांगितले, आम्हाला मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसकडे किती मते आहेत आणि निवडणुकीची रणनीती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती..
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो. या बैठकीत आम्हाला उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना देण्यात आली नव्हती. शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असेल, तर त्याची आम्हाला माहिती नाही.
सिल्वर ओकवरील बैठकीत केवळ निवडणुकीची रणनीती आणि पुढील भूमिका यावरच चर्चा झाली. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजता आम्हाला थेट माहिती मिळाली की श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. चंदू कदम यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेले सर्व दावे खोडून काढले.

