3 minutes reading time (529 words)

"साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"

"साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही" सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे.या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी याच दरम्यान एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे. "कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता" असं म्हटलं आहे.

 "सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली."

"बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता"



"पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता."

"साहेबांच्या पाठीवरचे मारहाणीचे वळ पाहून एसएम हळहळले"



"बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय" असं सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

...

Supriya Sule : "साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | NCP Supriya Sule facebook post Over sharad pawar belgaum agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

NCP Supriya Sule facebook post Over sharad pawar belgaum agitation. NCP Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच दरम्यान एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे. - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest maharashtra news in Marathi at Lokmat.com
सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांचा शिंदे-भाजप सरक...
“१९८६च्या आंदोलनात शरद पवारांनी लाठ्या खाल्या, पण…...