[My Mahanagar]पवारांनी हिंदू दहशतवाद शब्द वापरला
कर्नल पुरोहितांचा आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळला
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2008 मध्ये पक्षाच्या रॅलीमध्ये हिंदू दहशतवाद असा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्कार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने 2008 मध्ये अलिबागमध्ये काढलेल्या रॅलीत शरद पवार यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता, असा आरोप कर्नल पुरोहित यांनी केला होता. शरद पवार यांच्या या शब्दप्रयोगानंतर एक महिन्याने मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडला. यावर कर्नल पुरोहित यांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, शरद पवार यांनी या शब्दाचा वापर केल्याचे कधी ऐकले नाही, असे म्हणत याबद्दल पुरावा आहे का, असा प्रतिसवाल सुप्रिया सुळे यांनी केला. या शिवाय पुरोहित यांनी अनेक दावे-आरोप त्यांच्या लेखी उत्तरात केले आहेत.
कर्नल आर. के. श्रीवास्तव यांनी सैन्य मुख्यालयातील सांगितलेल्या आदेशाचा उल्लेख कर्नल पुरोहित यांनी त्यांच्या लेखी उत्तरात नमूद केला आहे. पंचमढीला असताना कर्नल श्रीवास्तव यांनी सैन्य मुख्यालयातील आदेश सांगून माझा फोन काढून घेतला आणि मला दिल्लीला जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर खुद्द कर्नल श्रीवास्तव यांनी मला टॅक्सीने भोपाळला नेले आणि विमानतळावर पोहचल्यानंतर दिल्लीऐवजी मुंबईचे तिकीट हातात दिले. याबाबत विचारण केली असता आदेश न पाळल्यास गंभीर परिणांना तोंड द्यावे लागेल, असा इशाराही दिला, असा दावा कर्नल पुरोहित यांनी केला आहे. कर्नल श्रीवास्तव एटीएसचे एजंटसारखे काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर एटीएस अधिकाऱ्यांनी मला ताब्यात घेतले. तेव्हा आयबीचेही अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जबरदस्तीने एका गाडीत बसवून खंडाळ्यात निर्जन बंगल्यात नेले. त्या बंगल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, सहआयुक्त परमबीर सिंह आणि इतर काही जण होते. दरम्यान, या सर्व प्रकरणात हेमंत करकरे यांच्यावरील आरोप म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

