[Deshdoot]खासदार सुप्रिया सुळेंना नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा झाला त्रास; सरकारकडे केली ‘ही’ मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने काल (रविवारी) शहरातील आडगाव परिसरातील स्वामी नारायण बँकवेट हॉल येथे एक दिवसीय शिबिर पार पडले. या शिबिरास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर आज नाशिकमध्ये (Nashik) गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांवर (Nashik-Trimbakeshwar) पडलेल्या खड्ड्यांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, असे ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना टॅग केले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर हा वर्दळीचा रस्ता असून, यावर दिवसभरात अनेक वाहने ये-जा करतात. मात्र, तुपादेवी फाटा ते पेगलवाडी फाटा पर्यंत रस्त्याची अवस्था अतिश दयनीय आहे. वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. आज सुप्रिया सुळे देखील याच रस्त्यावरून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी (Trimbakeshwar Darshan) गेल्या. त्यावेळी त्यांना या रस्त्यांवर पडलेले भले मोठे खड्डे दिसले. त्यानंतर त्यांनी लगेचच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पोस्ट टॅग करत त्यांच्याकडे हा रस्ता (Road) तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा आरती केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे युवक अध्यक्ष व मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम काडलग उपस्थित होते. यावेळी सुळे यांना पुरोहित मयूर थेटे व सहकारी यांनी विजयी भव असे आशीर्वाद दिले.यापूर्वी केंद्रात व राज्यात शरद पवार मंत्री असताना त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये दोन ते तीन वेळा भेट दिली होती. परंतु, दौरा आणि प्रोटोकॉलमुळे त्यांच्याकडून दर्शनाचा योग साधला गेला नव्हता. यानंतर आज त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.
शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीचं नुकसान, २१०० रुपये बहिणींना आणि युवांना रोजगार या मुद्द्यांवर सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आजचा मोर्चा काढला आहे. यात नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

