“देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा निधी कुठे जातो?” सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन सुरु आहे. यावेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शरद पवार उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर येथील खड्ड्यांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या," मी आज दर्शनाला गेले होते. कुंभाच्या बाबत मिटिंग होत आहे. अप्रतिम रस्ता असेल असे वाटले. पण प्रचंड खड्डे, आणि दुर्दशा होती." देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा निधी कुठे जातो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे त्या म्हणाल्या,"गडकरी याचं बारीक लक्ष असतं. गडकरी रस्ता चांगला नसेल तर ब्लॅक लिस्ट करतात. पण इथला रस्ता अतिशय खराब होत आहे. मला जायला १ तास आणि यायला १ तास लागला." तसेच आज नाशिक येथे होत असलेल्या आक्रोश मोर्चाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या," महाराष्ट्रसमोर आव्हाने आहेत. १५ वर्षांपूर्वी जी स्थिती होती आता तशी नाही. सरकारने कितीही सांगितले इन्व्हेस्टमेंट आल्या पण तसे नाही. डेटा तसा सगळं सांगतो. हिंजवडीत नोकऱ्या गेल्या. टॅरिफमुळे आपल्या सॉफ्टवेअरचे काय होईल सांगता येत नाही. अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे होती तशी झाली. जीएसटी बदल केले त्याचे स्वागत करतो. आता काळ ठरवेल किती बदल होईल."
"महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. लाडकी बहिण योजनेची २५ लाख नावे कमी झाली. महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. योग्य वेळ आली आहे. महाराष्ट्रात सरसकट माफी झाली पाहिजे. नाशिकमधील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांनी शेतात काळे झेंडे लावले आहेत. दर ३ तासाला शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो." शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आज नाशिक येथे मोर्चा सुरु आहे. पुढे मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत इचारलं असता त्या म्हणाल्या," या जीआरचा कुणाला फायदा होईल माहिती नाही. कळत नाही काय आहे. फडणवीस यांनी सोप्या भाषेत सांगावे. हैद्राबाद गॅझेट बाबत प्रेझेंटेशन करावे आणि सांगावे. निर्णय त्यांचा आहे त्यांनी सांगितले पाहिजे." अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

