[Lokmat]सातारा, सांगलीत निवडणुका; मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली?
सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
पुणे : सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका होत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण काय, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला केला. दुष्काळामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आपण केली होती. मात्र, सरकार निवडक निवडणुकांबाबतच असा निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी पाणीटंचाई, निवडणुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची न्यायालयीन लढाई, पर्यावरण आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांवर भूमिका मांडली. निवडणुका घ्यायच्या की पुढे ढकलायच्या, याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सातारा आणि सांगली जिल्हा बँकांच्या निवडणुका सुरू असताना पुणे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यामागचे कारण सरकार आणि संबंधित विभागाने सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.
पाणीवाटपात अन्याय नकोपावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी आणि चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी अडचणीत असून मुलांच्या शिक्षणाचेही प्रश्न निर्माण होत आहेत. अशा वेळी दुष्काळाचे राजकारण न करता त्यावर गांभीर्याने काम करण्याची गरज आहे, असे सुळे म्हणाल्या. शहर आणि ग्रामीण भागातील पाणीवाटप करताना कायद्यानुसार कोणावरही अन्याय होता कामा नये. शेतकरी आणि पुणेकर या दोघांच्याही हक्कांचा विचार व्हावा. पाणी नियोजनाची प्रक्रिया एक-दोन महिने आधी झाली असती, तर अडचण कदाचित कमी झाली असती, असे सांगत त्यांनी नियोजनाबाबत असमाधान व्यक्त केले.
यशाने हुरळून जायचे नसतेमहाविकास आघाडीला तीन ठिकाणी मिळालेल्या यशाबद्दल सुळे यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतल्यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यशाने वाहवून जायचे नसते किंवा अपयशाने नाराज व्हायचे नसते, असेही त्या म्हणाल्या.
पर्यावरणाचा समतोल राखूनच विकास हवाविकासाला आपला विरोध नाही; मात्र पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. वाढते तापमान आणि पावसाची परिस्थिती पाहता पर्यावरणातील बदल गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने पारदर्शकपणे द्यावीत आणि संबंधितांशी चर्चा करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

