3 minutes reading time (644 words)

[ABP MAJHA]अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का?

अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का?

राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी कोरमअभावी सभा तहकुब झाल्याने अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. बहुमत मिळालेल्या आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे 13 संचालक उपस्थित होते. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीने जोरदार हल्लाबोल केला आहे.

देवेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानताय का नाही?

राजू शेट्टी म्हणाले की, गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या 5 लाख दूध उत्पादकांचा अपमान करून, मतदान करणाऱ्या 5,400 ठरावधारकांचा अपमान करून, आज होणारी जी काही पहिली चेअरमनपदाची निवडणूक होती, त्या निवडणुकीचा कोरम पूर्ण होणे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आज विरोधी संचालकांनी सभा तहकूब केली. त्यांनी म्हटलं आहे की, देवेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानता का नाही? तुम्ही महाराष्ट्रातील पक्ष फोडले, संघटना फोडल्या. एक नामवंत दूध संघ केवळ आपल्या पसंतीचा अध्यक्ष होत नाही, म्हणून त्याच्या पाठीमागे अशा प्रकारची शुक्लकाष्ट लावताय? जरा तर काही तुम्हाला वाटत नाही?

हे आम्हाला कळत नाही का?

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, एका बाजूला गुजराती कंपनीला खुश करण्यासाठी, दिल्लीकरांना खुश करण्यासाठी तुम्ही जंगल तोडत निघालेला आहात, दुसऱ्या बाजूला त्याच गुजरातच्या अमुलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही हे सगळं कारस्थान करताय, हे काय आम्हाला कळत नाही का? गुजरात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी झालेली आहे आणि महाराष्ट्र म्हणजे त्याची वसाहत झालेली आहे आणि तुम्ही त्याचे व्हाईसरॉय झालेला आहात. कुठे घेऊन चाललात आमचा महाराष्ट्र? देवेंद्रजी, 5 लाख दूध उत्पादक शेतकरी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. दूध उत्पादकांना माझी विनंती आहे, ज्या विरोधी बारा संचालकांना तुम्ही निवडून दिलेला आहे, त्यांना जाऊन जाब विचारलं, तुम्हाला गैरहजर राहण्यासाठी संचालक केलं नव्हतं. तुम्हाला जमत नसेल तर राजीनामे द्या, घरात बसा, पोटनिवडणूक घेऊ आणि दुसरे उमेदवार निवडून आणू. परंतु ही असली थेरं आम्ही खपवून घेणार नाही.

सुप्रिय सुळेंचा हल्लाबोल

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' पॅनेलने विजय मिळवला. हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या इतका जिव्हारी लागला आहे की, तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अध्यक्ष निवडीची बैठकच होऊ न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हे अतिशय संतापजनक आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे वर्तन असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.

जनादेशाचा आदर राखणे अपेक्षित

गोकुळच्या सभासदांनी आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना संस्थेचा कारभार करू देणे आणि या जनादेशाचा आदर राखणे अपेक्षित आहे. त्याऐवजी संस्थेच्या कारभारात वारंवार हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न करणे हा सभासदांच्या विश्वासाचा आणि त्यांनी दिलेल्या कौलाचा अपमान आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही सतेज पाटील आणि गोकुळच्या सभासदांसोबत खंबीरपणे उभे आहोत. सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेपाचे हे प्रयत्न थांबवून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पडू द्यावी. गोकुळच्या सभासदांचा आणि सहकारी चळवळीच्या तत्वांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.

ही लोकशाहीची कोणती पद्धत?

आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माझे बंधू आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकून बहुमत मिळवले. कोल्हापूरच्या दूध उत्पादकांनी आणि मतदारांनी दिलेला हा कौल त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. या विश्वासाचा सन्मान करणे ही लोकशाहीची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी अध्यक्षपदाच्या निवडीत कोरम पूर्ण होऊ न देणे, तांत्रिक अडचणी निर्माण करणे आणि सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. बहुमत जनतेने द्यायचे आणि सत्ता स्थापनेचा मार्ग अडवायचा, ही लोकशाहीची कोणती पद्धत? राजकीय मतभेद असू शकतात; परंतु त्यासाठी सहकार संस्थांच्या कामकाजाचा आणि दूध उत्पादकांच्या विश्वासाचा बळी देता कामा नये. माझे राज्य सरकारला स्पष्ट आवाहन आहे की, राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोठेपणा दाखवावा. कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल मान्य करावा आणि गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमानुसार, पारदर्शकपणे व कोणत्याही अनावश्यक अडथळ्यांशिवाय पार पडू द्यावी.



...

अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार | Gokul eldction Raju Shetti launches a scathing attack on CM Fadnavis Vishwajeet Kadam and Supriya Sule also hit out hard

वेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानता का नाही? तुम्ही पक्ष फोडले, संघटना फोडल्या. एक नामवंत दूध संघ केवळ आपल्या पसंतीचा अध्यक्ष होत नाही, म्हणून त्याच्या पाठीमागे अशा प्रकारची शुक्लकाष्ट लावताय? जरा तर काही तुम्हाला वाटत नाही?
[Dainik Prabhat]पाणीवाटपात कोणावरही अन्याय नको
[Divya Marathi]पराभव जिव्हारी लागल्याने सत्ताधाऱ्य...