2 minutes reading time (379 words)

[Zee 24 Taas]'त्यांना' भाजपामध्ये घेऊ नका! सुप्रिया सुळेंचं थेट CM फडणवीसांना पत्र; 'आपल्यासमोर अनेक...'

'त्यांना' भाजपामध्ये घेऊ नका! सुप्रिया सुळेंचं थेट CM फडणवीसांना पत्र; 'आपल्यासमोर अनेक...'

Supriya Sule Letter To CM Devendra Fadnavis: तुळजापूरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजपात प्रवेश देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तुळजापूरातील या पक्षप्रवेशासंबंधात तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. काल अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपींचा समावेश असल्याकडे सुळे यांनी मुख्यमंत्र्‍यांचं लक्ष वेधलं आहे. हे पक्षप्रवेश जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले, याचे आश्चर्य वाटले. ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय, असा उल्लेख सुळे यांनी पत्रात केला आहे. नेमकं या पत्रात काय म्हटलंय वाचा हे पत्र जसेच्या तसे...

प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई

विषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..

मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,

तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल.

आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.

तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे.

धन्यवाद.

सुप्रिया सुळे

खासदार, बारामती लोकसभा 

...

Supriya Sule Letter To cm devendra fadnavis Objection About tuljapur drugs case accused in bjp | 'त्यांना' भाजपामध्ये घेऊ नका! सुप्रिया सुळेंचं थेट CM फडणवीसांना पत्र; 'आपल्यासमोर अनेक...'

Supriya Sule Letter To CM Devendra Fadnavis: लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.
[Saam TV]बिहारच्या निकालावर सुप्रिया सुळेंची प्रति...
[ABP MAJHA]ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्...