[ABP MAJHA]श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच,
राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule on Uday Samant: ज्या चाकणसाठी आदरणीय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना एमआयडीसी उभी केली, तिथे पवार साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या यंत्रणेवर विश्वास ठेवून हजारो उद्योजकांनी गुंतवणूक केली. मात्र, आज डबल इंजिन सरकारच्या काळात उद्योग तिथून बाहेर जात आहेत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे, उद्योग क्षेत्र फोनवर चालत नाही. जेव्हा नाशिकला निवडणूक प्रचारासाठी मंत्र्यांची सीट अडचणीत येते, तेव्हा त्यांना चार्टर विमान मिळते, पण जेव्हा लाखो गरीब मुलांच्या नोकऱ्या धोक्यात येतात, तेव्हा मुंबईवरून अवघ्या अडीच तासांवर असलेल्या चाकणला जायला उद्योगमंत्र्यांना वेळ मिळत नाही, ते रविवारी फोनवर बैठक घेतात आणि त्याची जाहिरात करतात, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी जर या राज्याची उद्योगमंत्री असते, तर बातमी लागल्या लागल्या तिथे धावून गेली असते. आंध्र आणि तेलंगणाचे उद्योगमंत्री उद्योजकांसाठी 'रेड कार्पेट' घालत आहेत आणि आपल्याकडे मात्र उद्योग टिकवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकार म्हणते की उद्योग बाहेर गेले नाहीत तर केवळ कागदावरच्या बंद कंपन्या बंद झाल्या आहेत. जर उद्योग गेले नसतील, तर तिथल्या रस्त्यांवर रोज दिसणारे मोठे खड्डे तरी खोटे आहेत का? प्रश्नांना बगल देणे म्हणजे लीडरशिप नाही, तर जबाबदारी घेऊन प्रश्न सोडवणे म्हणजे खरी लीडरशिप असते, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
हा देश संविधानाने चालतो, उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकत का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवली असल्याने शिवसेना ही त्यांचीच राहते, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी तोफ डागली.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोग आणि फोडाफोडीवरून जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले, हे अतिशय अयोग्य आहे आणि कोणत्याही संविधानाच्या चौकटीत बसत नाही. निवडणूक आयोगाचा (Election Commission) ज्या पद्धतीने गैरवापर झाला, ते एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली आणि ते हयात असताना त्यांनी ती उद्धवजींच्या हातात दिली. त्यामुळे शिवसेना ही फक्त उद्धवजींचीच असू शकते, कोणाचे वेगळे मत असते, तर त्यांनी राज ठाकरेंसारखी वेगळी चूल मांडून स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहायला हवे होते, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार पक्ष ठरवण्याचा अधिकार आमदार किंवा खासदारांच्या मतदानाला नसून, तो मूळ पक्ष स्थापन करणाऱ्यांकडेच राहतो. शरद पवार हे पक्षाचे 'फाउंडर मेंबर' आहेत आणि प्रत्येक कागदपत्र त्यांच्याच बाजूने आहे. इलेक्शन कमिशनने शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला आणि आमच्यावर अन्याय केला. यामागे जी 'अदृश्य शक्ती' आहे, तिने दोन संविधानिक पक्ष मोडीत काढण्याचे पाप केले आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयात 'तारीख पे तारीख' मिळते आहे पण सुनावणीसाठी वेळ मिळत नाही, हे मोठे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांचाच आहे. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी ही लढाई कार्यकर्त्यांसाठी आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

