[Sakal]खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे
राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 'अशा प्रकारांमुळे शासकीय यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही धोक्यात येईल,' अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अमोल तांबे, सचिन दोडके, सचिन बराटे, काकासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या, ''राज्यात खोटे शासन निर्णय काढले जात आहेत. त्यातून कोट्यवधी रुपयांची कामेही केली जात आहेत. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे.'' आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी त्या म्हणाल्या, ''आमदारच सर्वसामान्यांना मारहाण करत असतील, तर आपण महाराष्ट्राला काय आदर्श देणार आहोत.... मुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी.'
पुण्यात कोयता गँग आणि इतर गुन्ह्यांत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. सुळे यांनी वारजे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. तेथील वाहतूक कोंडी, हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष, हिंदी भाषेची सक्ती आणि एसएससी बोर्ड बंद करण्याच्या कथित प्रयत्नांवर त्यांनी आक्षेप घेतले..

