[Lokmat]गुन्हेगारांना फ्री हँड अन् कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक, ही कुठली पद्धत? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल"
"राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मात्र, गृहमंत्रालय सुस्त आहे. एकीकडे गुन्हेगारांना हँड द्यायचा आणि दुसरीकडे लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विकास लवांडे यांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की,\" राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली. या अटकेचा आम्ही निषेध करतो. राज्याचे गृहखाते नेमके कोणत्या दिशेने काम करतेय? हा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात घटना घडल्या. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, गुन्हेगारीबाबत अक्षरशः महाराष्ट्रात पुणे शहराचा पहिला तर भारतात पाचवा क्रमांक लागतो. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात, गँगवॉर होतात, महिलांवर आणि चिमुरडींवर अत्याचार होतो. राज्यात गुडांना मोकळे रान मिळते. परंतु, राजकीय नेत्यांना अटक केली जाते. या सर्व गोष्टी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांगायला पुरेशा आहेत.
"पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, \"हिंसेचे हे रक्तरंजीत दुष्टचक्र कधी थांबणार आहे का? एवढ्या घटना सातत्याने आसपास घडत असताना देखील गृहखाते हाताची घडी, तोंडावर बोट अशा अवस्थेत का बसले आहे? जनतेला केवळ उत्तरे नको तर कठोर कृतीदेखील हवी आहे. जनता दहशतीच्या छायेखाली असताना गृहमंत्रालय मात्र सुस्त आहे. गुन्हेगारांना फ्री हँड द्यायचा आणि दुसरीकडे लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनता आपल्याकडून न्याय मागतेय.

