[ETV Bharat]'यंदा आनंदाचा शिधा नाही, सरकारकडं पैसा तरी जनता उपाशी'
सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
पुणे : महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झाली, पण आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात 25 लाख नावं कमी झाली आहेत. तसंच आत्ता आनंदाचा शिधा देखील बंद करण्यात आला आहे."
सरकार करत आहे तरी काय? : "राज्याची परिस्थिती वाईट आहे, जगात सर्वाधिक कर्ज घेणारा देश भारत आहे. जीएसटीचा रेकॉर्ड असेल, पण फिक्स्ड रेकॉर्ड नाही. सरकार करत आहे तरी काय? इतके दिवस रिपोर्ट का पाठवला नाही? 80 कोटी रुपयांचा रस्ता केला जातो, पण आनंदाचा शिधा दिला जात नाही," असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली.
10 चांगल्या गोष्टी दाखवा : सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सरकारकडं आज 80 कोटी रुपयांचा रस्ता करायला पैसे आहेत, तर लाडकी बहीणचे पैसे आणि आनंदाचा शिधा का दिला जात नाही? स्मार्ट सिटीचं काय झालं? पंतप्रधानांनी प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घ्यायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? सरकार आल्यावर सरकारने १० चांगल्या गोष्टी केलेल्या दाखवा."
सरसकट कर्जमाफी करा : कफ सिरपमुळं १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, "हे खूप धक्कादायक आहे आणि याची चौकशी केंद्र सरकार स्तरावर केली पाहिजे." राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि कार्तिकीची पूजा कोण करणार याबाबत विचारलं असता, सुळे म्हणाल्या, "विठ्ठलाची पूजा कोणीही करेल, पण सरसकट कर्जमाफी होणे आवश्यक आहे. विठ्ठलाकडं माझी एवढी मागणी आहे."
पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे : कुख्यात गुंड निलेश घायवळ पळून गेल्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "कुठली तरी मोठी अदृश्य शक्ती यामागे काम करत आहे. मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी. मी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या बाबतीत चर्चा करणार आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे आणि त्यामागे कोण जबाबदार आहे, कोणती अदृष्य शक्ती काम करत आहे हे पाहणं गरजेचं आहे."

