[Lokmat]पुण्यातील डीजेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे - सुप्रिया सुळे
पुणे : पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
फुरसुंगी येथील कचरा डेपोच्या विरोधात गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात व समाविष्ट गावांमधील विविध प्रश्नांसाठी खा. सुळे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. या भेटीनंतर खा. सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, \" पुणे गुन्हेगारीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असल्याचे मी यापूर्वीच आयुक्तांना पत्र देऊन निदर्शनास आणले आहे. आंदोलक, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात; मग लोकांना फसविणारे आणि गंभीर गुन्हे करणारे का सापडत नाहीत ? कोयता गॅंगवर पोलिस कारवाई का करत नाहीत ?' सरकार सत्तेत आल्यापासून पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. जगभर परीक्षा होतात, मात्र आपल्या जिल्ह्या-तालुक्यातच पेपर फुटतात. यास जबाबदार कोण आहे ? असे खा. सुळे म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांना सरकार चालविण्यात अपयश राज्यात आदिवासी विद्यार्थी, मराठा, ओबीसी, शेतकरी, विद्यार्थ्यांसह विविध घटक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे दाद मागत आहेत. दोनशे आमदारांचे सरकार असूनही राज्यातील जनता रोज रस्त्यावर येत आहे. महायुतीला जनतेने मतदान केले; मात्र त्याबदल्यात जनतेला काय मिळाले? सत्ताधारी सरकार राज्य चालविण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोपही खा. सुळे यांनी केला.
फुरसुंगी कचरा डेपोबाबत स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. कचरा डेपोचे काम चुकीच्या पद्धतीने होत आहे. ते काम योग्य पद्धतीने झाले पाहीजे.
सुप्रिया सुळे ,

