[Sarkarnama]सुप्रिया सुळेंचा मास्टरस्ट्रोक, मनसे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीत खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एका रहिवासी सोसायटीतील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सुळे यांनी मनसेचे माजी आमदार स्व. गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे आणि मुलगी सायली वांजळे यांची भेट घेतली.
आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कारण या भेटीमुळे आगामी काळामध्ये वांजळे भाऊ बहीण नवीन राजकीय वाट निवडणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. .
मयुरेश वांजळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) सक्रिय असून, त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीनंतर त्यांची पक्षातील सक्रियता कमी झाल्याची चर्चा आहे..
सायली वांजळे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका असून, त्या महापालिकेच्या कामांसाठी यापूर्वीही सुप्रिया सुळे यांना भेटल्या आहेत. अशा परिस्थितीत सुळे यांच्या या भेटीने मनसे आणि अजित पवार यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या या भेटीमुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वांजळे कुटुंबाचे या मतदारसंघात विशेष स्थान आहे. त्यामुळे सुळे यांनी घेतलेली ही भेट राजकीयदृष्ट्या तटस्थ असली, तरी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने त्याचे पडसाद उमटू शकतात. .
सुप्रिया सुळे यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आणि मनसेत चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीत सुळे यांचा हा मास्टरस्ट्रोक ठरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र ही भेट राजकीय नव्हती असा खुलासा मयुरेश वांजळे यांनी केला आहे..

