[Lokmat]पुणे शहरात गुन्हेगारी वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार - सुप्रिया सुळे
पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर आता क्राईम कॅपिटल झाले असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पुणे हे गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाचव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणीही सुळे यांनी केली.
शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि विषारी दारूमुळे झालेले नागरिकांचे मृत्यू या पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, शहरात कोयता गैंग मोकाट फिरते, हल्ले,मारहाण, महिला व मुलींवर अत्याचार अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे पुणे पोलिसांचे आणि गृह विभागाचे अपयश आहे.
मुंबई, नागपूर, जळगाव, नाशिक, संभाजीनगर याठिकाणी सर्व दुकाने व व्यवसाय सुरू असताना केवळ पुण्यात पोलिस रात्री दुकानदार व व्यावसायिकांना दमदाटी करून दुकाने बंद करायला भाग पाडतात. या सर्व गोष्टींना पोलिस आयुक्तच जबाबदार असून, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा त्यांची बदली करणे गरजेचे आहे. या सर्व घटनांमध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घातले असेल. मात्र, आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत, असेही खा. सुळे म्हणाल्या.
पुण्यात सुधारणा नाही झाली तर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.खा. सुळे असेही म्हणाल्या...-नागपूरमधील क्राईम कमी झाला आहे. मात्र पुण्यात वाढला. प्राजक्त तनपुरेंचे अडचणींमुळे पक्षांतर.-काँग्रेसमधील शंभर मोठी घराणी आज भाजपमध्ये, त्यामुळे काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे.-अहिल्यानगर जिल्ह्यात राम शिंदे सोडता सगळे नेते काँग्रेसचे.-तंत्रज्ञान आले तरी पेपर फुटतात कसे? देशात ही परिस्थिती येणार हे राहुल गांधी यांनी पूर्वीच सांगितले होते.

