[NDTV Marathi]पुण्यात खरंच लॉकडाऊन? रात्री 10 वाजेनंतर सर्व दुकानं बंद होणार?
सुप्रिया सुळेंची पोस्ट, पोलिसांचे स्पष्टीकरण
Pune News: पुणे शहरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या जोरदार अफवा पसरत आहेत. पण पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लॉकडाऊनचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सांगत शहरात कोणताही लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाने केवळ सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जमावबंदी (Prohibitory Orders) लागू केली आहे. या आदेशानुसार रात्री 10 वाजेनंतर रस्त्यावरील फेरीवाले, खाऊ गल्ली आणि छोट्या स्टॉल्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान या निर्णयामुळे शहरातील छोटे व्यावसायिक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण (Pune Police Commissioner's Clarification )पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार रात्री 10 वाजेनंतरचे निर्बंध केवळ सर्व प्रकारचे फेरीवाले (स्ट्रीट वेंडर्स) आणि हॉकर्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खाऊ गल्ली, पान टपऱ्या, रस्त्यावरील मोकळ्या जागेत असणारे जेवणाचे सेटअप (हॉटेलबाहेरील जागा) यासारख्या लोकांसाठी असतील.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहनपरवानाधारक (लायसन्स असलेल्या) हॉकर्सना रात्री 10 वाजता व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे शहरातील कायमस्वरूपी दुकाने, रेस्टॉरंट्स आणि इतर मोठे व्यवसाय त्यांचे नियमित कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकतात. नागरिकांनी लॉकडाऊनच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्नदरम्यान, या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र प्रवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' पोस्ट करत पोलीस प्रशासनाच्या निर्णयाविरोधात टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, "पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री 10 वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या 24 तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?
एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे.गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत?
पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे."
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले…
— Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026

