[Political Maharashtra]धायरी येथील रखडलेल्या डीपी रस्त्यांच्या कामासाठी पुणे महापालिका आयुक्त, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यावर!
पुणे: धायरी गावातील रखडलेल्या डीपी रस्त्यांच्या प्रश्नावर पुणे महापालिका आयुक्त आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. धायरीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात चारही डीपी रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर असूनही, गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम कागदावरच आहे. या विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी काही नागरिकांनी आयुक्तांसमोर लोटांगण घालून आपल्या व्यथा मांडल्या.
या संदर्भात आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "पालिकेच्या संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळेच या रस्त्यांची कामे रखडली आहेत. या प्रश्नावर थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही राज्य सरकारला पत्र पाठवले होते, तरीही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही."
बेनकर यांनी पुढे सांगितले की, "पालिकेने २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच भूमी अभिलेख विभागाकडे मोजणीसाठी आवश्यक पैसे जमा केले आहेत. असे असूनही, भूमी अभिलेख विभागाने अद्याप रस्त्यांची मोजणी पूर्ण केलेली नाही. मोजणी झालीच असली तरी त्याचा नकाशा पालिकेकडे जमा केलेला नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या भूमी अभिलेख विभागाकडून सातत्याने उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहेत."
धायरीतील सावित्री गार्डन – मेकडोनाल्ड चौक, काका चव्हाण बंगला – श्री कंट्रोल चौक, बेनकर वस्ती, आणि हायब्लिस सोसायटी – लक्ष्मी लॉज हे चार महत्त्वाचे डीपी रस्ते अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. पर्यायी रस्ते नसल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात आणि जीवघेणे प्रसंग नित्याचे झाले आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक रहिवाशांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तरीही पालिकेने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
स्थानिकांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) याबद्दल माहिती मागवली असता, ३० दिवसांची मुदत उलटूनही त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी धनंजय बेनकर यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. ते म्हणाले, "येत्या दहा दिवसांत सर्व रस्त्यांची मोजणी पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडू." या पाहणी दौऱ्यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

