[My Mahanagar]पुण्यातील घटना कायद्याची दुर्दशा दर्शवणारी, सुप्रिया सुळेंचा संताप
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मंगळवारी पहाटे पीडित तरुणीला आपल्या बोलण्यात फसवून स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्ये नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. परंतु, यामुळे आता पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. परंतु, या घटनेमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा कशाप्रकारे झाली आहे, हे पाहायला मिळत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (Supriya Sule was furious over the rape case of girl in Pune Swargate Bus Depo)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडियावर या प्रकरणी पोस्ट लिहिली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरातच कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणाचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवला गेला पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुळेंनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले आहे की, "अतिशय संतापजनक!
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे." असे म्हणत सुळेंनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच, "या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे." असे खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टच्या म्हटले आहे. तर त्यांनी ही पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना टॅग केली आहे. परंतु, या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पुण्यातील गुन्हेगारीविषयी प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत.
पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान स्वारगेट बसस्थानकावर आली होती. यावेळी एका व्यक्तीने पीडित तरुणीला बस दुसऱ्या ठिकाणी लागल्याचे सांगितले. तरुणीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ती त्या बसच्या दिशेने गेली. तिथे गेल्यानंतर तिला ती बस बंद दिसली. त्यामुळे पीडित तरुणीने आरोपीला बस बंद असल्याचे म्हटले. परंतु, आरोपीने तिला काही तरी कारण सांगत हीच बस जाणार आहे, काही प्रवासी बसमध्ये आहेत, हवे तर टॉर्च लावून पाहा, असे सांगितले. या आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पीडित तरुणी बसमध्ये चढली. याचाच फायदा घेत आरोपी सुद्धा तिच्या मागोमाग बसमध्ये चढला आणि त्याने तरुणीवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. गाडे हा कुख्यात आरोपी असून तो जामिनावर बाहेर आल्याचे बोलले जात आहे. आरोपीवर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या पोलीस फरार दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत.
