[Policenama]‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्या रोहितला पाठवली’;
खासदार सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला
इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | 'राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्या रोहितला पाठवली,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता, असा टोला देखील सुळे कोकाटे यांना लगावला.
खासदार सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या रमी गेम खेळण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली. इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. जो माणूस विधिमंडळामध्ये मोबाईलवर गेम खेळत होता, एकतर तो पकडला गेला, त्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्ही बसला होता, त्याच्या पाठीमागच्याच माणसाने व्हिडिओ काढला, याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच विचाराच्या माणसाने काढलाय. समोरच्या लोकांनी तर व्हिडिओ काढला नाही, पण बिचार्या रोहितला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. अहो व्हिडिओ आम्ही नाही काढला, मागे बसणाऱ्याने काढलाय, त्यात आमचा काय संबंध? आम्ही फक्त ट्विटरवर टाकला, असे सुळे म्हणाल्या.
'गंमत अशी झाली की दत्तात्रय भरणे यांना शेती खाते गेले आणि कोकाटे यांना क्रीडा खाते मिळाले. पण आता खेळ करताना आम्ही केंद्रामध्ये कायदा पास केला. ज्या गेमवर पैसे लावले जातात, ते ऑनलाईन सर्व खेळ या देशात बंद केले आहेत. केंद्र ज्यावेळेस कायदा करते, त्यावेळी ते प्रत्येक राज्यासाठी करतं राज्य सरकारने त्याचे नियम करावे लागतात, मात्र आता महाराष्ट्रात नियम करताना क्रीडा मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी हातामध्ये पत्ते खेळण्याची नक्कल करत या कायद्याचे नियम कोण करणार,' असा सवाल केला आहे.

