[Bakhar Live]नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
नवी दिल्ली : Supriya Sule महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेत उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनातील चर्चेदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि निवडणुकीत झालेल्या अनुचित घटनांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर मारामाऱ्या, बंदुका दाखवणे आणि प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. अशा प्रकारची परिस्थिती आजवर कधीच नव्हती.
चर्चेदरम्यान केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माहिती दिली की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि अतिवृष्टी मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून अद्याप मिळालेला नाही.
यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, "सत्तेत येताना महायुतीमधील नेते सातत्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे म्हणत होते, पण प्रत्यक्षात त्या दिशेने कोणतीही ठोस पावले दिसत नाहीत. ही शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बाब आहे."
सुप्रिया सुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत बोलले आहेत. परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मात्र प्रलंबितच आहे.
सुळे यांनी केंद्र सरकारला विनंती केली, "महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीतील गोंधळ आणि शेतकऱ्यांची बिकट स्थिती पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारला तातडीने सूचना करून कर्जमाफी आणि मदत प्रस्ताव त्वरीत मंजूर करण्यास सांगावे. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे."

