[Lokmat]एवढा निधी खर्च करूनही कामात स्पष्ट ‘मिसमॅच’; ‘कनेक्टिंग लिंक’च्या कामाचे ऑडिट करा, सुप्रिया सुळेंची मागणी
"पुणे : पुणे आणि मुंबईला द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग (मिसिंग) लिंकची पावसामुळे झालेली दुरवस्था पाहता या संपूर्ण कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सकाळी महापालिकेत येऊन विविध कामांचा आढावा घेतला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सुरुवातीला वेळ वाचणार म्हणून आम्हीही या 'मिसिंग लिंक'चे कौतुक केले; पण आता तिथले जे व्हिडिओ समोर येत आहेत, ते पाहून सुरुवातीला मला वाटले की, हे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे (एआय) बनवले आहेत की काय? पण प्रत्यक्षात तिथे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. एवढा निधी खर्च करूनही कामात स्पष्ट 'मिसमॅच' दिसत आहे. यात मी थेट घोटाळा झाला असे म्हणणार नाही; पण या कामावर किती पैसे खर्च झाले आणि याचे ऑडिट झाले का? या सगळ्यांची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील. या कामाची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
"जनतेच्या सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाहीमोठे प्रकल्प करताना सरकारने पर्यावरणाचा विचार केलेला नाही. परिणामी, एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र पॅरलाइझ (ठप्प) झाला आहे. "सत्तेतील लोक नेहमी ७० वर्षांचा हिशेब मागतात, पण गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत बसलेल्यांच्या कामाचा हिशोब कोण देणार? सत्तेतील लोकांना केवळ पक्ष फोडण्यात आणि घरे फोडण्यात रस आहे. हे पाप करण्यासाठी सरकारकडे वेळ आहे. मात्र, जनतेच्या सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. पुण्यात पडणारी झाडे आणि विस्कळीत झालेले जनजीवन पाहता, सरकारचे नियोजन केवळ 'इन्फ्रा' आणि 'कंत्राटदारां'साठीच आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रभू रामाच्या समोर उघडपणे चोऱ्या सुरू "राम मंदिरासाठी भाजपच्या काही नेत्यांनी खूप मोठा संघर्ष केला. आज मंदिराच्या दानपेटीत चोऱ्या होत आहेत, तिथे भ्रष्टाचार सुरू आहे, हे पाहताना त्यांना काय वाटत असेल? प्रभू रामाच्या समोर उघडपणे चोऱ्या सुरू आहेत आणि हे आम्ही सहन करणार नाही. तिथल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी खासदार नीलेश लंके अयोध्येला जाऊ इच्छितात, पण त्यांना तिथे परवानगी नाकारली जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.\" असेही त्या म्हणाल्या.

